Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

शांताबाई म्हणजे महाराष्ट्राची चंद्रभागा : श्रीनिवास पाटील

 


महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेतर्फे आयोजन 

  पिंपरी : कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आणि सन्मान सोहळा  पिंपरी मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेतर्फे डॉ डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या साहाय्याने  थाटात पार पडला. 'बकुळगंध' या जन्मशताब्दी ग्रंथाचे  प्रकाशन करण्यात आले.हा कार्यक्रम डी पी यु ऑडिटोरियम,डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज,संत तुकाराम नगर,पिंपरी येथे १२ ऑकटोबर रोजी सायंकाळी ४ वाजता झाला.

 सिक्कीम चे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील,साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस,संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते ' बकुळगंध ' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. पदमश्री गिरीश प्रभुणे,साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी,कवी रामदास फुटाणे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

महाराष्ट्र साहित्य  परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, प्रमोद पाटील , विनिता ऐनापुरे , डॉ. रजनी शेठ यांनी स्वागत केले.रत्ना दहिवेलकर , श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.  राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. विनीता ऐनापुरे यांनी आभार मानले.

खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, 'शांताबाईंच्या काव्यात महाराष्ट्राचा गोडवा आणि शालीनता होती. नद्यांना उपनद्या मिळाव्यात, तसे काव्याचे सर्व प्रकारचे रस त्यांच्या गीतलेखनात मिसळले. महाराष्ट्राची चंद्रभागा होण्याइतके योगदान त्यांनी दिले. त्या आपल्यातच आहेत, आणि पुन्हा जन्म घेतील, हा विश्वास मला आहे'.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.पी. डी. पाटील म्हणाले, ' शांता शेळके यांनी शब्द वैभव वाढविण्यासाठी कष्ट घेतले. शब्दाचे सामर्थ्य त्यांनी वाढविले. त्या आपल्या सर्वांच्या आठवणीत आहेत.साहित्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेमुळे अनेक चांगले उपक्रम घडून येत आहेत. शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीची सांगता आमच्या येथे होत आहे, हा आनंदाचा क्षण आहे.

रामदास फुटाणे म्हणाले, 'शांताबाई गुंज गुंज सोनं मोजल्यासारखं तोलून मापून मूल्यवान असं बोलत. त्यांचे कविता, लोकसंगीताबद्दलचं ज्ञान, तरलता वाखाणण्यासारखी होती. ' बकुळ गंध ' प्रकल्पाच्या मागे डॉ.पी. डी. पाटिल खंबीरपणे उभे राहिले, ही महत्वाची बाब आहे.

प्रा.डॉ.मिलिंद जोशी म्हणाले, ' शांताबाईंची आठवण सांस्कृतिक विश्व रोज काढत असते. पिंपरी साहित्य परिषदेचा हा उपक्रम अतिशय अतुलनीय आहे '.

ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांनी ' वादळवारं सुटलं गं ' हे गीत सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली.

पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, ' मराठी साहित्याला वेगळा काव्य बहर शांता शेळके यांच्यामुळे आला '.

अशोक पत्की म्हणाले, ' भावगीत, कोळीगीत अशा प्रत्येक विषयाच्या खोलात जाऊन शांता शेळके गीतलेखन करीत असत. त्यांच्यासमवेत काम करण्याचा अनुभव संस्मरणीय होता '.

श्रीपाल सबनीस म्हणाले, 'शांता शेळके यांच्या गीतलेखनात शब्द -सुरांचा संगम झाल्याचे दिसून येते. शांताबाई सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतिक आहे. त्यांच्या गीतलेखनाने महाराष्ट्राला वेड लावले. त्यांच्या योगदानाची दखल घेणारा ' बकुळगंध ' हा ग्रंथ महत्वाचा ठेवा आहे.

शांता शेळके यांच्या कुटुंबातील सुलभा कोष्टी, रेवती संभारे, मीना शेळके यांचाही सत्कार करण्यात आला.

उल्हास  पवार,फ. मुं. शिंदे, सुधीर गाडगीळ, न.म. जोशी, भाऊसाहेब भोईर,राजीव बर्वे, रविमुकुल , विसूभाऊ बापट, अलका देव- मारूलकर, प्रा. प्रतिमा इंगोले,डॉ.मंदा खांडगे,प्रकाश भोंडे, सुरेश साखवळकर,अजित कुमठेकर आदि मान्यवर सभागृहात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...