Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अधिक कचरा निर्माण होणा-या गृहनिर्माण संस्था, आस्थापनांनी कच-याचे योग्य व्यवस्थापन करावे : आयुक्त शेखर सिंह

 


पिंपरी  : पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमांत सर्वांचा सक्रीय सहभाग आणि सहकार्य महत्वाची भूमिका बजावत आहे. शहरातील ज्या  गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कंपन्या किंवा इतर आस्थापनांमध्ये प्रतिदिन १०० किलो आणि त्यापेक्षा अधिक  कचरा निर्माण होतो अशा आस्थापनांनी त्यांच्या स्तरावर  कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.  

          नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम २०१६ अन्वये प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्था अथवा इतर आस्थापना यांनी त्यांच्या आस्थापनेत निर्माण होणा-या ओल्या (जैव विघटनशील) कचऱ्यावर त्यांच्याच आस्थापनेत कम्पोस्टिंग, बायोमिथेनायझेशन अथवा अन्य तंत्रज्ञानाद्वारे प्रकिया करून जिरवणे  तसेच त्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक आहे. या कचऱ्याचे कम्पोस्टिंग कसे करावे, यासाठी काय उपाययोजना उपलब्ध आहेत, या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत याबाबतची माहिती संबधित आस्थापनांना व्हावी, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  

          पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक विनोद जळक, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात यांच्यासह ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे मॉडेल्स तयार करणाऱ्या कंपन्या, शहरातील विविध गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कंपन्या किंवा इतर आस्थापनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          घनकचरा व्यवस्थापनाबाबत विविध प्रश्न आणि समस्याबद्दल उपस्थितांसमवेत आयुक्त शेखर सिंह यांनी संवाद साधला. आपल्या स्तरावर कच-याचे व्यवस्थापन करणा-या आस्थापनांना महापालिका  मिळकत करामध्ये सवलत देखील देत आहे, असे नमूद करून आयुक्त शेखर सिंह म्हणाले, स्वच्छाग्रह उपक्रमात आतापर्यंत सर्वांनी सक्रीय सहभाग घेतला म्हणून सद्यस्थितीत शहरामध्ये सुमारे ८५ टक्के पेक्षा अधिक प्रमाणात कचऱ्याचे विलगीकरण होत आहे. केंद्रशासन आणि राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबधित आस्थापनांनी कच-याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. कचरा विलगीकरणासोबत आता प्रतिदिन १०० किलो पेक्षा अधिक प्रमाणात कचरा निर्मिती होत असलेल्या आस्थापनांनी त्या कच-याचे व्यवस्थापन करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी विहित मुदतीत  अशा आस्थापनांनी निर्माण होणा-या ओल्या (जैव विघटनशील) कचऱ्यावर त्यांच्याच आस्थापनेत कम्पोस्टिंग, बायोमिथेनायझेशन अथवा अन्य तंत्रज्ञानाद्वारे प्रकिया करून जिरवावा  तसेच त्याचे व्यवस्थापन करावे. प्रकल्प उभारणीकरीता  महापालिका आवश्यक माहिती देण्यासाठी या आस्थापनांना मदत करेल. शिवाय प्रकल्प उभारणीसाठी येणा-या अडचणी सोडविण्यासाठी देखील महापालिका प्रशासन पुढाकार घेईल. घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले. नागरी सहभाग आणि सहकार्यातून   स्वच्छतेच्या चळवळीला अधिक चालना मिळेल, असा विश्वासही  त्यांनी यावेळी व्यक्त केला.

घनकचरा व्यवस्थापनाबाबत विनोद जळक यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले. तर आभार विनोद जळक यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...