खंडाळा बोर घाटात केमिकल वाहतूक करणारा टेम्पो जाळून खाक
9/30/2022 09:35:00 PM
0
लोणावळा : मेडिसिनल केमिकलचे ड्रम घेऊन हैद्राबाद येथे निघालेल्या आयशर टेम्पोला खंडाळा बोर घाटात अचानक आग लागल्याने सदर टेम्पो पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या सहा टँकरच्या साहाय्याने ही आग विझवण्यात यंत्रणांना यश मिळाले. सुमारे दोन ते अडीच तास हा सर्व थरार सुरू होता. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (29 सप्टेंबर) मध्यरात्री 11.45 ते 12 वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील किलोमीटर क्रमांक 42 जवळ मॅजिक पॉईंट, एचपीसीएल ब्रिज येथे पुणे लेनवर सदर घटना घडली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आयशर टेम्पो (क्रमांक MH 46 BM 0077) भिवंडी, मुंबई येथील जय भगवान गोडाऊन येथून मेडिसिनल केमिकलचे ड्रम भरून हैदराबाद कडे निघाला होता. खंडाळा घाटात अचानक टेम्पोला आग लागल्याची जाणीव झाल्याने ड्रायव्हरने हॅन्ड ब्रेक लावून गाडी थांबवली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र यामुळे एक्सप्रेस हायवेने होणारी वाहतूक खोळंबली होती. सदर घटना समजताच खोपोली पोलीस, आयआरबी, देवदूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. देवदूतच्या तीन, खोपोली फायर ब्रिगेडच्या दोन तर उत्तम गलवा कंपनीची एक आशा सहा फायरब्रिगेडच्या मदतीने ही आग विझवण्यात यंत्रणांना यश आले. रात्री 1.45 वाजण्याच्या सुमारास सदर गाडी रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर पाण्याच्या साहाय्याने रस्ता थंड करून 2.15 वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीला पुन्हा खुली करण्यात आला. तर मुंबई लेन ही त्यापूर्वीच 1 वाजण्याच्या सुमारास वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली होती.