पिंपरी : वल्लभनगर बसस्थानकात खड्डे पडले असल्याने प्रवासी,चालक,वाहक यांना त्रास सहन करावा लागत होता. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्याच दिवशी तातडीने सिमेंट काँक्रेटची गाडी मागवून सर्व खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे अवघ्या दोन दिवसात बसस्थानकातील खड्डे बुजले.
वल्लभनगरच्या आगार प्रमुख स्वाती बांद्रे यांच्यासोबत संपूर्ण बसस्थानक व आगाराची पाहणी आमदार बनसोडे यांनी केली. बस स्थानकातील फलाटाचे कठडे मोडकळीस आलेले आहेत. बस स्थानक आवारात डांबरीकरण व काँक्रेटिकरण नसल्याने सर्व दूर धुळीचे व खड्ड्याचे साम्राज्य आहे. ड्रेनेज लाइन बुजून गेल्याने पावसाळ्यात पाणी वाहून न जाता बस स्थानक परिसरात साचून राहते.
तसेच बस स्थानकाची इमारत ही २४ वर्षे जुनी असल्याने काही ठिकाणी स्लॅब देखील खचलेला आहे.ही सर्व दुरावस्था पहिल्यानंतर आमदार बनसोडे यांनी बस स्थानक व आगराचे पुनर्विकास करण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या महिनाभरात निगडी बुकिंग ऑफिस येथे स्थानिक आमदार विकास निधीमधून टॉयलेट बाथरूम बांधून देणार असल्याचे देखील सांगितले.
यावेळी आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे, सहा. कार्यशाळा अधीक्षक हनुमंत गोसावी, सहा. वाहतूक अधीक्षक पल्लवी पाटील, वाहतूक नियंत्रक स्मिता कुटे, वरिष्ठ लिपिक पी बी. सुरवाडकर , वाहतूक नियंत्रक रमेश चिपाडे, वाहक विकास तुळे व आगारातील इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

