पिंपरी चिंचवड भाजप निवडणुकीसाठी सज्ज : अमोल थोरात
9/27/2022 10:45:00 PM
0
पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी मजबूत असून, आमदार लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा दावा भाजपाचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभासद आढावा बैठक सोमवारी झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप निवडणुकांना घाबरत असून, निवडणूक पुढे ढकण्यासाठी खटाटोप करीत आहे, अशी टीका केली होती. त्याला अमोल थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. थोरात म्हणाले की, राष्ट्रवादीच्या चुकीच्या कारभाराला कंटाळून पिंपरी चिंचवडकरांनी 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत दिले. गेल्या पाच वर्षांत पक्षाकडून विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. भाजपाच्या नेतृत्त्वात शहराची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे. संघटनात्मक पातळीवर आम्ही चांगली तयारी केली आहे. बुथ यंत्रणा सक्षम केली असून, ‘‘शेवटच्या घटकाचा विकास’’ हे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही सकारात्मक विचारांनी काम करीत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करीत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्या तरी भाजपा निवडणुकीसाठी सज्ज आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी शहरातील एकही प्रश्न मार्गी लावला नाही. पिंपरी चिंचवडला दुय्यम वागणूक देण्यात आली. त्याला पिंपरी चिंचवडकर निवडणुकीत समर्पक उत्तर देतील, असा दावाही अमोल थोरात यांनी केला आहे.