चिंचवडगाव : दशक्रिया घाटावर पाण्याची व्यवस्था व्हावी
9/29/2022 02:55:00 PM
0
पिंपरी : चिंचवडगावातील मंगलमूर्ती मंदिर हे पवित्र स्थान असल्यामुळे असंख्य नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराजवळील घाटावर दशक्रिया विधी केले जातात. त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत; परंतु एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने दुसऱ्या दिवशी टाक्यांमध्ये पाणी शिल्लक राहत नाही. तसेच त्या टाक्यांमधील पाण्याचा वापर काही नागरिक व्यावसायिक आणि निवासी कारणांसाठी करतात. दशक्रिया विधी करताना केस कापल्यानंतर अंघोळीसाठी आणि दशक्रिया विधीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबीयांना, नागरिकांनी नाईलाजाने विकतचे पाणी वापरावे लागते. वास्तविक निधनासारखी दु:खद घटना घडल्यानंतर कुटुंबीयांना विकतचे पाणी आणून अंघोळ आणि दशक्रिया विधी करावे लागत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी लेखी निवेदन दिले असता आयुक्तांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.