पालिकेच्या जनसंपर्क विभागातील अधिकार्यांचा गलथान कारभार
9/28/2022 05:47:00 PM
0
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांसोबत फोटो काडून मिरवण्यात आणि प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या बातमीत आपले नाव कसे येईल याची काळजी घेण्यात धन्यता मानत आहेत.मंगळवारी विकासकामांना मान्यता देण्यासाठी आयुक्तांची बैठक झाली या बैठकीचे वृत्त पाठविताना जनसंपर्क विभागाचे अधिकारी नेमके कोणत्या तंद्रीत होते असा प्रश्न प्रसिद्धीपत्रक पाहिल्यावर माध्यम प्रतिनिधींना पडला. एकाच प्रसिद्धीपत्रकात प्रशासक म्हणून सुरुवातीस शेखर सिंह आणि शेवटी राजेश पाटील यांचे नाव देण्यात आले होते. माध्यम प्रतिनिधींनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर भानावर आलेल्या अधिकार्यांनी सुधारीत प्रसिद्धीपत्रक पाठविले.
वास्तविक जनसंपर्क विभागाचे काम कार्यक्रमाची प्रसिद्धी करणे असते. कार्यक्रमात मिरवणे नव्हे याचा विसर महापालिकेच्या जनसंपर्क विभागाला पडला आहे. राज्यशासनाच्या माहिती विभागातील अधिकारी कधीही अशाप्रकारे शासकीय कार्यक्रमात मिरवताना दिसत नाहीत. मान्यवरांबरोबर फोटो काढणे तर दूर राहिले. ते अशाप्रकारे वागले तर त्यांना वरिष्ठांकडून कारणेदाखवा नोटीसा बजावल्या जातील याची त्यांना जाणीव आहे. तशीच जाणीव आयुक्तांनी पालिकेच्या जनसंपर्क विभागातील प्रसिद्धीलोलुप अधिकार्यांना करून द्यायला हवी.