शाश्वत विकासासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा : गिरीश महाजन
9/22/2022 10:28:00 PM
0
चिंचवड : शाश्वत विकासासाठी ग्रामपातळीवर परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी चिंचवड येथे केले. भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्रालय आणि राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, केंद्रीय पंचायत राज विभागाचे सचिव राजेश कुमार,अतिरिक्त सचिव चंद्रशेखर कुमार,सह सचिव रेखा यादव, राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, यशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते. महाजन पुढे म्हणाले, देशात शाश्वत विकासाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील पंचायतराज संस्थांचे योगदान महत्वाचे आहे. यासाठीच पंचायतराज विभागाच्या माध्यमातून सरपंचांना महत्वाचे अधिकार देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना थेट निधी देण्यात येतो. यापुढेही गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. भारत सरकारचे सचिव सुनिलकुमार म्हणाले, देशाला विकासित करण्यात ग्रामीण भारताची भूमिका महत्वाची आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, पंचायतराज विभागाने शाश्वत विकासासाठी नऊ संकल्पना विकसीत केल्या आहेत. नऊ संकल्पनेला विचार घेत ग्रामपंचायतींना विकासाचे नियोजन करावयाचे आहे. राज्यात राळेगण सिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा ही आदर्श गावे आहेत.लोकसहभाग व शासकीय योजनांची जोड देवून हजारो गावे विकासाच्या प्रक्रियेत पुढे येत आहेत. महाराष्ट्रात ग्राम विकासाच्या दृष्टीने अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वपूर्ण ठरतो आहे. यासाठीच ग्राम विकासाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. यावेळी देशातील विविध राज्यातील सरपंच, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

